पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे. दिव्यांग पत्नीचा शारीरिक छळ करून तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा आरोप पतीवर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर संबंधित व्हिडिओ नातेवाइकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हायरल केल्याचा आरोपही आहे. या प्रकरणी पोलिसांनी तडीपार असलेल्या पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला दिव्यांग असून तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर तिची आरोपीसोबत ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सुमारे सहा वर्षांपूर्वी दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे.

लग्नानंतर काही काळाने आरोपी पतीकडून महिलेला त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. दरम्यान, दोघे काही काळापासून वेगवेगळे राहत होते. मुलगा नेमका कोणाकडे राहणार, यावरून मागील आठ महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.

या वादातून आरोपीने पीडित महिलेला एका हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्याचे व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हे व्हिडीओ नातेवाइकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हायरल केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या प्रकारानंतर पीडित महिलेने सुरुवातीला वाकड पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर तिला पिंपरी पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी आळंदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.
विशेष म्हणजे, त्याच्या तडीपारीचा कालावधी संपण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असताना तो शहरात परतल्याचा आरोप आहे. तडीपारीच्या कालावधीत शहरात प्रवेश करून त्याने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर येत आहे. तडीपार असलेला आरोपी शहरात परतल्यानंतरही पोलिसांना त्याची माहिती कशी मिळाली नाही, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.






