पिंपरी : पिंपरीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीवर चाकूने हल्ला करून प्रियकराने देखील स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १० ऑक्टोबर) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील एका लॉजमध्ये घडली आहे.
जखमी झालेल्या प्रेयसीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नीतेश नरेश मिनेकर (वय-३४, रा. येरवडा) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश आणि एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. नीतेश हा २८ वर्षीय तरुणीसोबत गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील एका हॉटेलमध्ये लॉजवर आला होता. काही वेळाने त्यांच्या खोलीमधून तरुणीच्या आरडाओरड करण्याचा आवाज आला.
त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ११२ या क्रमांकावर कॉल करून याबाबतची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी, दरवाजा वाजवत, म्हणाले आम्ही पोलिस आहोत, दरवाजा उघडा, असे सांगितले.
दरम्यान, त्यानंतर नीतेश म्हणाला पाच मिनिट थांबा. मी दरवाजा उघडतो असे सांगितले. मात्र, काही वेळ जाऊन देखील ही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा नीतेश याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तर, ती तरुणी जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पोलिसांनी तातडीने तरुणीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय.सी.एम.) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हा जीवघेणा हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या का केली. याबाबत पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.