पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून एक लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई ४ मार्च रोजी सायंकाळी मोहितेवाडी येथे करण्यात आली. कमलेश राजपूत (रा. मोहितेवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उमेश पुलगम यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोहितेवाडी येथे संतोष कदम यांच्या शेतात दारू भट्टी लावली. या भट्टीत ५ हजार लिटर दारू तयार करण्यासाठी त्याने १ लाख रुपये किमतीचे रसायन एकत्र केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दरोडा विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.