पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सह्याद्री कॉलनी बिजलीनगर चिंचवड येथे एक 22 वर्षीय बांधकाम मजुराचा काम करत असताना हाय टेन्शनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना सोमवारी (दि.10) सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी बांधकाम ठेकेदाराला अटक केली आहे. प्रताप बबन सोळंके (वय-22 रा. बिजलीनगर, चिंचवड मुळ रा. यवतमाळ) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.
याबबत प्रताप याचा भाऊ राहुल बबन सोळंके (वय-25 रा. श्रीराम कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बांधकाम ठेकेदार अफसर इब्राहिम शेख (वय-49 रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठेकेदार याने बिजलीनगर येथील सह्याद्री कॉलनीतील बांधकाम साईटचे काम सुरु होते. उंचीवरील भींतीवर पाड बांधण्यासाठी लागणारे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही साहित्य पुरवले नाही. बांधकाम साईटच्या वरून गेलेल्या हाय टेन्शन विजेचा तारेच्या ठिकाणी भिंतीला प्लास्टर करण्यासाठी पाड बांधण्यास फिर्यादी यांचा भाव प्रताप याला काम करण्यास सांगितले.
मात्र, हे काम करत असताना आरोपीने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. त्यामुळे फिर्य़ादी यांच्या भावाला हाय टेशन विजेच्या तारेचा स्पर्श लागून त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.