पिंपरी(पुणे) : शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसंकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याची सुरूवात किवळे येथून ६ जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सायंकाळी साडेचार वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबविला होतं. या उपक्रमामुळे राज्यातील जनतेला एकाच छताखाली विविध कागदपत्रे मिळाली. थेरगाव आणि मावळमध्येही हा उपक्रम पार पडला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गेले होते.
त्याप्रमाणेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत. शिवसेनेचे खासदार असलेल्या तसेच मागच्या वेळी शिवसेनेने निवडणूक लढविलेल्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. यानिमित्त शिवसंकल्प अभियानात मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा किवळेतील मुकाई चौकातील मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.