पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची आगामी 40 वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी भाजपाच्या सत्ताकाळात प्रकल्प हाती घेण्यात आले. त्याअंतर्गत चिखली येथे १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वयीत झाला असून, त्याद्वारे समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
आता चिखली येथील प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी. आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी भूमिका घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी प्रभावीपणे पाठपुरावा सुरू केला होता. याबाबत महिनाभरापूर्वी आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी मंजुरी देऊन महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावला आहे.
महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद
आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये वाढलेली लोकसंख्या आणि पाण्याची गरज याचा विचार करता भामा आसखेड प्रकल्पांतर्गत चिखली येथे प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी सूचना केली होती. त्याला महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कार्यवाही सुरू केली. शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. चिखली, तळवडे, मोशी, चऱ्होली, दिघी, डुडूळगाव, जाधववाडी या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.
शहरातील आगामी ४० वर्षांतील वाढत्या नागरिकरणाचा विचार करुन भामा आसखेड धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पिंपरी-चिंचवड शहरात आणण्यात येणार आहे. त्या अंतर्गत १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वीत करुन त्याचे लोकार्पण झाले आहे. आता चिखली येथे २०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाला महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. लवकरच कामाला सुरूवात होईल. डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रकल्पातून तळवडे, चिखली, मोशी, चऱ्होली आणि दिघी परिसरात पाणी पुरवठा सुरू होईल. महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.