पुणे : अपघाताच्या गुन्ह्यातील गाडी परत करण्यासाठी १ लाखाची मागणी करून त्यातील ७० हजार रुपये स्वीकारली होती. उर्वरित रकमेतील २० हजाराची लाच स्वीकारताना चिखली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नरेंद्र लक्ष्मण राजे, सहायक पोलीस उपनिरीक्षक(वय-५४) चिखली पोलीस स्टेशन असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.(Pune Bribe News)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झाला होता. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र राजे हे करत होते. सदर अपघाताच्या गुन्ह्यातील तक्रारदार यांची गाडी त्यांना परत करण्यासाठी आरोपी नरेंद्र राजे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती.
तसेच तडजोडीअंती 1 लाख रुपये देण्याचेही ठरले होते. त्यापैकी आरोपी नरेंद्र राजे यांनी तक्रारदार यांच्या बुधवारी (ता.१३) १५ हजार आणि शुक्रवारी ५५ हजार रुपये स्विकारले असून उर्वरित रक्कमेची लाच मागणी केली आहे. अशी तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी नरेंद्र राजे यांनी तक्रारदार यांच्याकडून अपघातातील वाहन परत करण्यासाठी उर्वरित रक्कमेपैकी २० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, आरोपी नरेंद्र राजे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.