पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अतिक्रमणांविरोधात एक अत्यंत धडक आणि कठोर मोहीम सुरू केली आहे. सरकारी जमिनी बळकावून त्यावर अनधिकृतपणे धार्मिक स्थळे उभारणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने अशा बांधकामांवर थेट बुलडोजर चालवणार असल्याचं म्हंटल आहे. अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याच्या भूमिकेमुळे आता शहरातील सरकारी आणि खासगी जागेवरील अतिक्रमणे हटवण्यावर महापालिकेचा विशेष भर आहे.

नुकत्याच हाती घेतलेल्या या मोहिमेत कुदळवाडी, चिखली आणि पवार वस्ती येथील 11 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामध्ये मंदिरे आणि मशिदींचा समावेश असला तरी, ही कारवाई कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नसून ती केवळ नियमांच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले आहे. नियमबाह्य ठरणाऱ्या चर्च आणि बुद्ध विहारांवरही भविष्यात अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ही कारवाई मध्यरात्री कडेकोट पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्यात आली. कारवाईदरम्यान काही ठिकाणी स्थानिकांकडून विरोध होऊन तणाव निर्माण झाला होता, तसेच दगडफेकीचे व्हिडिओही समोर आले आहेत. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून कारवाई शांततेत पार पाडल्याचा दावा महापौरांनी केला आहे.







