उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या तब्बल 754 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील या 754 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (ता. 12) विशेष ग्रामसभांचे आयोजन करून थेट आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर ग्रामीण भागातील निवडणूक प्रक्रियेला अधिकृत आणि वेगवान गती मिळणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया राबवली जात आहे. ओबीसी (OBC) आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही याची काटेकोर काळजी घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
सदस्य संख्येनुसार ओबीसी जागांचे गणित
7 सदस्य ओबीसी 1 जागा
9 सदस्य ओबीसी 2 जागा
11 सदस्य ओबीसी 2 जागा
11 सदस्य ओबीसी 3 जागा
17 सदस्य ओबीसी 4 जागा
SC-ST आरक्षण
अनुसूचित जाती व जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव राहतील. काही प्रभागांत संबंधित घटकांची लोकसंख्या कमी किंवा शून्य असली, तरी नियमानुसारच आरक्षण निश्चिती केली जाईल. 8 जून 2026 विशेष ग्रामसभेची अधिकृत सूचना देणे (प्रक्रिया पूर्ण), 12 जून 2026 विशेष ग्रामसभेत प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढणे. 17 जून 2026, प्रवरूप अधिसूचनेस (Draft Notification) मान्यता देणे, 19 जून 2026 प्रवरूप आरक्षण जाहीर/प्रसिद्ध करणे, 19 ते २५ जून 2026 नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदत, 3 जुलै 2026 प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपला अभिप्राय देणे, 8 जुलै 2026 जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम अधिसूचनेस मंजुरी, 10 जुलै 2026 अंतिम आरक्षण अधिकृतपणे प्रसिद्ध करणे.
दरम्यान, या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांपासून ते नवख्या उमेदवारांचे डोळे लागले असून, १२ जून रोजी कोणत्या प्रभागात कोणाचे नशीब उघडणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.






