रायगड : पेण तालुक्यातील हमरापूर परिसरातील शितोळेवाडी हद्दीत झाडाझुडपांमध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासांत करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिला आणि दोन्ही आरोपी यांची पूर्वीपासून ओळख होती. घटनेच्या दिवशी बाजार परिसरात त्यांची भेट झाली होती. त्यानंतर तिघेही एकत्र गेले होते. मात्र आरोपींनी मद्यपान केलेले असताना त्यांनी महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी तिच्यावर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 123/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 8 जून रोजी रात्री हा गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान मृत महिला काही दिवसांपूर्वी माहेरी आल्याची माहिती समोर आली असून त्या पतीपासून वेगळ्या राहत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी महिलेच्या चेहऱ्यावर मारहाण करून तिचा गळा दाबल्याचे समोर आले आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाझुडपांमध्ये अर्धनग्न अवस्थेत टाकून आरोपी फरार झाले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.
या तपासातून रामअवतार ऊर्फ शेरा रामविश्वास केवट याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तो पेण तालुक्यातील एका क्रशरवर काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर 9 जून रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक पोलीस, सायबर सेल तसेच तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या एका दिवसात गंभीर गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात आल्याने पेण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







