पिंपरी-चिंचवड : तळेगाव येथे अपघाताची घटना घडली आहे. किराणा साहित्य आणायला गेलेल्या दुचाकीस्वार तरुणाला कंटेनरने धडक दिल्याने डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात तळेगाव स्टेशन येथे वडगाव-तळेगाव रस्त्यावर झाला. निखिल रामदास ननावरे (30, रा. मलठण, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी चंद्रप्रकाश रामकृपाल यादव 28, रा. सुलतानपूर, जि. प्रितीपूर, उत्तरप्रदेश) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय किसन राऊत ( 34, रा. भिसे काॅलनी, वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय राऊत यांचा मेव्हणा निखिल ननावरे हे दोन दिवसांपूर्वी कामाच्या शोधानिमित्त फिर्यादी दत्तात्रय यांच्याकडे राहण्यासाठी आले होते. दरम्यान, रविवारी(30 मार्च) रात्री किराणा साहित्य घेण्यास निखिल घरातून बाहेर पडले. त्यावेळी वडगाव-तळेगाव रस्त्यावर चंद्रप्रकाश यादव याने भरधाव कंटेनर चालवून निखील यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकीत निखिल यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच निखिल यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर कंटेनरचालक चंद्रप्रकाश यादव हा घटनास्थळी न थांबता पळून जात होता. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला पकडुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.