पिंपरी : पिंपरीत शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोसायटीचा स्लाईड गेट अंगावर पडून तीन वर्षांच्या चिमुरडीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. हातात बाहुली घेऊन खेळायला गेलेली चिमुरडी जागेवरच शेवटचा श्वास घेती झाली. हृदय पिळवून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गिरीजा शिंदे असं या चिमुरडीचं नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेहमीप्रमाणे ही तीन वर्षांची चिमुकली आपल्या मित्रांसोबत खेळायला गेली होती. खेळताना हातात बाहुली घेऊन ती पळत सुटली. तेवढ्यात तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलाने सोसायटीचे स्लाइड होणारं गेट ओढलं. मात्र या गेटमध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट गिरिजाच्या अंगावर पडून गिरिजाचा खेळता खेळताच शेवट झाला. पिंपरी-चिंचवडच्या बोपखेल परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
हातात बाहुली घेऊन गिरीजा खेळत होती. तेव्हा अचानक तिच्या अंगावर गेट पडलं. हा प्रकार बघून आजूबाजूच्या मुलांनी शेजारच्यांना आवाज दिला. त्यावेळी आजूबाजूचे लोक पळत आले आणि तिला उचलून दवाखान्यात नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच गिरिजाचा मृत्यू झाला होता.