पिंपरी, (पुणे) : पुणे येथील मगरपट्टा सिटीत राहणा-या 26 वर्षीय महिलेच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आणि आपण सीबीआय ऑफिसर बोलत असल्याचे सांगितले. एका गुन्ह्यात तुमचा सहभाग असून कारवाई टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगत या महिलेकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रदीप सावंत आणि राजेश मिश्रा नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे महिन्यात फिर्यादी महिला या घरी असताना सुरुवातीला त्यांना अनोखी क्रमांकावरून फोन आला आणि टेलिकॉम डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या मोबाईलवर अंधेरी पोलीस स्टेशन येथून तक्रारी प्राप्त झाले असून मोबाईल क्रमांक लवकरच बंद होणार असल्याचे सांगितले. यापुढे अंधेरी पोलीस स्टेशनचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील असे म्हणून फोन ठेवण्यात आला. त्यानंतर फिर्यादी महिलेला व्हाट्सअप क्रमांकावर व्हिडिओ कॉल आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तींनी सीबीआय ऑफिसर प्रदीप सावंत आणि राजेश मिश्रा असल्याचे सांगितले.
दरम्यान, समोरील व्यक्तीने फिर्यादीला घाबरवण्यासाठी त्यांचा नरेश गोयल यांच्याशी संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले. या प्रकरणातून सुखरुप वाचायचे असेल तर पैशाची मागणी केली. त्यानुसार घाबरलेल्या फिर्यादी महिलेने दोन लाख वीस हजार रुपये आरोपी व्यक्तीने सांगितलेल्या बँक अकाउंट वर पाठवले. मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गीते करीत आहेत.