पिंपरी, ता. ०१ : पिंपरी-चिंचवडमध्ये झपाट्याने विकसित होणाऱ्या चिखली परिसरात सोनवणे वस्ती, पिंगळे रोड आणि चिंचवड- आकुर्डी लिंक रोडला जोडणाऱ्या मुख्य चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चिखलीतील प्रस्तावित शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचे शौर्य आणि मूल्यांची प्रेरणा नागरिकांना मिळावी, असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
चिखली आणि परिसराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुमारे ३० फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. तसेच, मावळ्यांचे छोटे पुतळेही उभारण्यात येणार आहे. या चौकात पादचारी मार्गिका, नागरिकांना बसण्यासाठी पायऱ्या, लॉन अशा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि मूल्यांचे नव्या पिढीला स्मरण व्हावे. शिव विचार तरुणांमध्ये रुजला जावा. या करिता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने चिखली आणि परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा. तसेच, मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराज चौक विकसित करावा, अशी संकल्पना होती. त्यानुसार, प्रशासनाने चिखली येथे पिंगळे रोड, सोनवणे वस्ती आणि चिंचवड-आकुर्डी लिंक रोडला जोडणाऱ्या चौकाचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्तावित केले आहे. प्रशासनाने सदर काम तातडीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.