पिंपरी चिंचवड : भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये गुरुवार (दि. २४) रोजी सकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पाण्याची टाकी कोसळून त्यात ५ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर ६ जण जखमी झाले होते. लेबर कॅम्पमध्ये राहणा-या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी संतोषकुमार रामनरेश सहानी, (वय ३५ वर्ष, राहणार. लेबर कॅम्प, सदगुरुनगर, हनुमान कॉलनी, भोसरी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुमार लोमटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:१५ च्या सुमारास पाण्याची टाकी कोसळून त्यात 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. नवीन जोन्ना, माल्ला महाकुर, सोनु कुमार, रविंद्र कुमार, सुदाम बेहरा (सर्व रा. लेबर कॅम्प, सदगुरुनगर, हनुमान कॉलनी, भोसरी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. तर संतोषकुमार रामनरेश सहानी, शिवजतन निशाद, मुन्ना रमेश चौधरी, महंमद सलीम मंगरु शेख, जितेंद्रकुमार मंडल, महंमद हरुण रशिद हे ६ जण जखमी झाले आहेत.
फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, आरोपीत मजकुर कुमार लोमटे याने सदर टाकीचे बांधकाम हे कुशल कामगाराकडुन करुन घेतले नाही. तसेच सदरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे व कच्चे आहे. हे माहित असताना, सदर पाण्याचे टाकीमध्ये पाणी भरुन ती निष्काळजीपणे वापरात आणल्याने ती फुटुन त्याच्या भिंती अंगावर पडून ५ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत. कुमार लोमटे हा ५ जणांच्या मृत्यस व दुखापतीस कारणीभुत आहे. या फिर्यादीवरून कुमार लोमटे याच्यावर भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.