पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आगीची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील कुदळवाडीत एका कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला आहे. त्यानंतर या कंपनीत मोठी आग लागल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी १७ फेब्रुवारीला संध्याकाळी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील एच आय कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. कंपनीला आग लागल्यानंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कंपनीतील बॉयलर फुटल्याने आगीने रौद्र रुप धारण केलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं.
अग्निशमन अधिकारी विनायक नळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या कुडाळवाडी येथील भंगाराच्या गोदामात बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे १० अग्निबंब आणले होते. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.