पुणे : पुण्यात एका डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत ५० वर्षीय व्यक्तीचा पाय वाचवला. रिक्षा चालकाच्या पायातील २५ सेंटीमीटरची गाठ यशस्वीपणे काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या रुग्णाच्या डाव्या पायाला तब्बल २५ सेंटिमीटरची गाठ होती. या गाठीमुळे त्यांना जास्त वेळ उभे राहता येत नव्हते आणि चालताही येत नव्हते, तसेच त्यांच्या पायाला सूजही येत होती.
या गाठीने पायाच्या मज्जातंतूंना व्यापल्याने पाय वाचण्याची शक्यता कमी होती. मात्र, डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाचा पाय वाचवला आहे. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाल्याने त्याला चालता येणे शक्य झाले आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांकडून डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
गणेश खरात (नाव बदलले आहे) या रिक्षा चालकाच्या पायातून २५ सेंटिमीटरची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ते पुण्यातील रहिवासी आहेत. डाव्या पायाला मोठ्या आकाराची गाठ आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना सातत्याने वेदना होत होत्या, आणि त्यांना खूप वेळ उभा देखील राहता येत नव्हतं.
त्यामुळे त्यांना पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खरात यांच्या पायाला सुमारे सहा महिन्यांपासून वेदना होत असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत निदर्शनास आले. पायातील गाठीने त्यांच्या मज्जातंतूना व्यापले होते. त्यामुळे त्यांचा पाय वाचण्याची शक्यता कमी होती. असं डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. कर्करोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चंद्रा आणि कर्करोग शल्यचिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ. समीर गुप्ता यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडली. पायांच्या स्नायूंना पुरवठा करणाऱ्या मज्जातंतूंना वाचविण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
मज्जातंतूंचे नुकसान झाले असता त्यांना कायमचा अर्धांगवायू येऊन अपंगत्व आले असते. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीन तासांहून अधिक वेळ लागला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाला. त्याला चालता येणे शक्य झाल्याने सात दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.