पिंपरी : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावती दौरा करत आहेत. तर दुसरीकडे कुणबी नोंदी तपासण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व दप्तरामधील नोंदी तपासणीचे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड विभागात आतापर्यंत २३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. येथे कागदपत्रे तपासणीचे काम शुक्रवारपर्यंत करण्यात येणार आहे.
महापालिकेतील सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदी तपासण्याचे काम सध्या सुरू आहे. कर संकलन, शिक्षण, वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदींच्या तपासणीचे काम सुरू आहे.
दरम्यान, वैद्यकीय विभागातील २ हजार २२२ आणि कर संकलनामधील ११ हजार १८३ कागदपत्रांवरील नोंदी तपासण्यात आल्या असून, यामध्ये एकही मराठा-कुणबी नोंद आढळली नाही. तर शिक्षण विभागातील पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या असून, त्यामध्ये २ हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या.
शासनाने कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा जातीच्या नोंदी तपासण्याचे नव्याने आदेश दिले आहेत. त्याचे वर्गीकरण करून तसा स्वतंत्र अहवाल दिला जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याचे समजते.