पिंपरी : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आंदोलनांना अखेर यश आले. मात्र, राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे अद्याप सगेसोयऱ्यांच्या व्याख्येसह कायद्यात रूपांतर करण्यात आलेले नाही. कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (ता. १४) पिंपरी-चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे.
मसुद्याचे सगेसोय-यांच्या व्याख्येसह कायद्यात रूपांतर करणे, अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे, राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी जरांगे हे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून १४ फेब्रुवारी रोजी बंदची हाक दिली आहे. शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केले आहे.
या वेळी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहरात दुचाकी रॅली व चार चाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. तेथून काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, रहाटणी, पिंपरीगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे जाणार आहे.
रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर चिंचवड स्टेशन, आकुर्डी, भक्ती-शक्ती समूह शिल्प निगडीकडे जाणार आहे. तेथून रॅली तळेगाव दाभाडे मार्गे वडगावकडे जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक, वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले.