पिंपरी : किरकोळ कारणावरून दमदाटी, मारहाण करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिकअप वाहनासमोर गाडी उभी केल्याने पिकअप चालकाने हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघांनी पिकअप चालकाला दमदाटी करुन खिशातील मोबाईल आणि ८०० रुपये जबदस्तीने चोरुन नेले. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
हा प्रकार मंगळवारी (ता. २३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिखली परिसरातील कृष्णानगर येथील सिमेंट ग्राऊंड जवळ घडला. याबाबत पिकअप चालक रंजितसिंग हजारीलाल जांगडा (वय-३८, रा. आरगना सोसायटी, कृष्णानगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रोहन उर्फ इंदर शंकर पंडीत (वय-२०, रा. भिमशक्ती नगर, स्पाईन रोड, चिखली), रोहीत रामदास दिलसे (वय-२९, रा. मोरे वस्ती, चिखली), आकाश बाळासाहेब पाटोळे (वय-२१, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पिकअप गाडी (एमएच १४ के.ए. ४२०२) घेऊन रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपी ट्रिपलसिट दुचाकीवरुन पाठिमागून फिर्यादी यांच्या गाडीसमोर अचानक आले. त्यामुळे फिर्यादी यांनी गाडीचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आरोपींनी त्यांची गाडी फिर्यादी यांच्या गाडीसमोर थांबवली. त्यानंतर फिर्यादी यांच्याजवळ येऊन हॉर्न का वाजवतो अशी विचारणा करुन त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ८०० रुपये व गाडीची चावी चोरून घेऊन गेले.
याबाबत रंजितसिंग यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.