दौंड: राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध गावठी दारू वाहतुक करणारे पिकअप पांढरेवाडी (ता. दौंड) येथे रविवारी (ता.२८) पकडले आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी अर्जुन बिरबल राठोड व जितेय शिवा राठोड ( दोघेही रा. पांढरेवाडी ता .दौंड जि पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात दारू बंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पथक रविवारी दौंड तालुक्यात गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पथकाला पांढरेवाडी – एमआयडीसी परिसरात बेकायदा गावठी दारूची विक्री करणाऱ्यासाठी वाहन येणार, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत नाकाबंदी केली.
दरम्यान, पथकाने एक संशयित पिकअप थांबवून तपासणी केली असता पिकअपमध्ये 20 प्लास्टिक 35 लिटर क्षमतेच्या डपकीमध्ये एकुण 700 लिटर गावठी दारू व पिकअप सह एकूण 5 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक चरणसिंग राजपुत , उप अधीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे, उपनिरीक्षक मांजरे, सहायक फौजदार दत्ता गवारे, जवान केशव वामने, नवनाथ पडवळ, चंद्रकांत इंगळे, अशोक पाटील यांच्या पथकाने केली आहे.
View this post on Instagram