उरुळी कांचन, (पुणे) : येथील निसर्गोपचार आश्रमात अनेक व्यक्ती येत असतात, याबद्दल आनंद वाटतो. पण येथून [परत जाताना खाकरा,चटण्या असे पदार्थ मोठ्या प्रमाणात घेऊन जातात. पण या पदार्थांबरोबर त्यांनी आश्रमात उपलब्ध असलेली आरोग्य आणि विशेषत: निसर्गोपचार याविषयी विक्रीसाठी उपलब्ध असलेली पुस्तके घेऊन जावीत, ती स्वतः वाचावीत आणि वाचून झाल्यावर इतरांना द्यावीत, अशी अपेक्षा निसर्गोपचार आश्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. नारायण हेगडे यांनी व्यक्त केली.
निसर्गोपचार आश्रम आणि न्यूज स्टोरी टुडेने आठवडाभर आयोजित केलेल्या विशेष शिबिराच्या अंतिम दिवशी त्यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी डॉ. हेगडे बोलत होते.
डॉ हेगडे म्हणाले की, आश्रमातून नेण्यात येणारे पदार्थ हे लवकरच संपणारे असतात. पण पुस्तकं ही न संपणारी आणि सतत आपल्याला ज्ञान देणारी असतात. म्हणून ती आपण आवर्जून नेली पाहिजेत. वाचली पाहिजेत आणि वाचून स्वतःच्या घरी न ठेवता इतरांना वाचण्यासाठी दिली पाहिजेत.
महात्मा गांधी यांनी 1946 साली स्थापन केलेला हा आश्रम, त्यांच्या विचाराप्रमाणे चालविण्याचा आजवर अतोनात प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी मानवी जीवनाचा सखोल अभ्यास, चिंतन करून जे विचार जगाला दिले आहेत. ते आजही मार्गदर्शक असून, त्यानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे.
दरम्यान, यावेळी बोलताना न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने निसर्गोपचार जीवन शैलीचा अंगीकार करण्याची नितांत गरज आहे. या विधानाचा संदर्भ देऊन ते म्हणाले की ही अतिशय महत्वाची सूचना असून त्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू. या संवादावेळी निसर्गोपचार आश्रमाचे वैद्यकीय संचालक डॉ.अभिषेक देविकर, योग शिक्षक सतीश सोनवणे आणि इतर साधक उपस्थित होते.