बापूसाहेब काळभोर
लोणी काळभोर: हवेली तालुक्याच्या पूर्व भागात लग्न, साखरपुडा आणि दशक्रिया विधी आदी कार्यक्रमांना निर्धारीत वेळेपेक्षा एक ते दीड तास उशीर होत असून या कार्यक्रमात होणाऱ्या भाषणबाजीला नागरिक वैतागले आहेत. भाषणबाजीमुळे व कार्यक्रमाला होणाऱ्या उशिरामुळे सर्वांचाच वेळ वाया जात आहे. यावर तातडीने मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात येथील सर्वांचे पाहुणे असलेल्या शेजारच्या गावातील माजी सरपंचांनी आज भर दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात लोणी काळभोर ग्रामस्थांचे कान टोचले. यानंतर तरी ग्रामस्थ भूमिका बदलतील का ? हा एक मोठा प्रश्न आहे.
हवेली तालुक्यात नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे परिसरात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. तालुक्यात आर्थिक सुबत्ता ही वाढली आहे. त्यामुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांबरोबरच लग्न, साखरपुडा, टिळा, वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होतात. यातच दशक्रिया विधी सारख्या कार्यक्रमांना जास्तीत जास्त पुढारी मंडळी, पाहुणे, सगे सोयरे, नातेवाईक कार्यक्रमांना येत असतात. आलेल्या पुढाऱ्यांचा मानसन्मान केला जातो. त्यासाठी एका खास निवेदकाला आमंत्रित केलेले असते. त्याच्या माध्यमातून सर्वांचे स्वागत होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ जातो. त्यानंतर नेते मंडळींची आशिर्वाद भाषणबाजी सुरू होते. यात अनेकांचा वेळ वाया जातो. दुसऱ्या कार्यक्रमाला त्यांना वेळेत पोहोचता येत नाही.
लग्नाचा आनंद सोहळा असो किंवा दशक्रियेचा दुःखद प्रसंग हे परंपरेने चालत आलेले संस्कार आज त्याला लोकांनी इव्हेंटचे स्वरूप दिले आहे. बदल होत असतात; परंतु बदल समाजाच्या हिताचे असले पाहिजे. लग्नात जावई आणि मामाचे सत्कार, नेतेमंडळींची भाषणांमुळे लग्नांना एक ते दोन तासांनी उशीर होत आहे.
अलीकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरी मुलीचे औक्षण करण्यासाठी महिलांची संख्या कमीत कमी २५ च्या जवळपास असते. एका महिलेला औक्षण करायला मिनिटांचा वेळ लागतो. यामध्ये ५० मिनिटे वाया जातात. पूर्वी असे नव्हते. केवळ पाच महिला औक्षण करायच्या आणि कार्यक्रम भाषणाविना व्हायचे, त्यामुळे वेळेत बचत होत होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. एकच कार्यक्रम तीन चार तासांचा होत असल्याने आलेल्या सर्वांचा मोठा वेळ वाया जात आहे.
कार्यक्रमाला कितीही उशीर झाला, कितीही वेळ गेला तरी तालुक्यात साखरपुडा, लग्न, दशक्रिया विधी कार्यक्रम पुढाऱ्यांच्या भाषणाशिवाय होतच नाहीत. त्याला सर्वसामान्य नागरिक वैतागले असले, तरी नेत्यांना त्यांच्या भाषणाचा मोह सुटत नाही. वेळेचा व समोर असलेल्या जनतेचा विचार न करता ही मंडळी भाषणबाजीत मग्न असतात.
दोन वर्षे करोनामुळे लॉकडाऊनमध्ये गेली, त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. आर्थिक परिस्थिती खराब झाली. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणा वाढत गेला. त्याचा सर्वाधिक परिणाम मुला- मुलींची लग्ने करताना त्यांच्या पालकांवर होत आहे. आपल्या मुलं-मुलींची लग्ने धूमधडाक्यात करण्याची पालकांची इच्छा असते; मात्र नोटबंदी, त्यानंतर करोनाचे संकट यामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातच मुला-मुलींची लग्ने करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने पालकांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक, सामाजिक आधाराची गरज आहे.
लग्न संस्कार हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळेच लग्न जमविण्यापूर्वी वधू-वर यांच्यातील गुणमिलन किती आहे हे पाहिले जाते. परंतु, अलीकडे हे सर्व जरी सुरु असले, तरीही लग्न सोहळे केवळ दिखाऊपणाने होताना दिसतात. कारण लग्न लावण्याचा एक विशिष्ट मुहूर्त काढला जातो आणि त्याच वेळेवर ते लग्न लागणे अपेक्षित असते. यासाठीच आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. पण सध्या ही मुहूर्त वेळ टाळणे ही जणू फॅशन होऊन बसली आहे.
पुणे शहरालगतच्या पट्टय़ात विशेषतः हवेली तालुक्यातील परिसरात लग्न समारंभाची वेळच बदलली आहे. यजमान ठरवतील तोच मुहूर्त. कारण लग्न समारंभात मंचावर नेते मंडळीचा मोठा राबता वाढलेला आहे. अशात जे वधू-वर विवाहबद्ध होणार आहेत, त्यांना एका बाजुला बसवून सत्कार समारंभ सुरू होतो. परिसरातील अनेक दिग्गज हजेरी लावतात आणि जी बाकी वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी आलेली त्यांना तिष्ठत बसावे लागते. नेते मंडळीतील अनेकांना आशीर्वादपर दोन शब्द बोलण्याचा मोह आवरत नाही.
लग्न वेळ टाळणे ही जरी फॅशन असली तरीही किती उशीर होतो याचे भानच राहत नाही. सध्या तर अर्धा-एक तासांवरून हा कालावधी दीड ते दोन तासांवर पोहोचला आहे. त्यामुळेच जमलेल्या वऱ्हाडी मंडळीत लॉकडाऊनमधील लग्न समारंभाची आठवण होत आहे. लाॅकडाऊनमध्ये मोजक्याच नातेवाईकांमध्ये लग्न किती छान होत असे, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
सध्या तापमान ४० अंशापेक्षाही अधिक वाढल्याने जीवाची लाही लाही होत आहे. पण जवळच्या नातेवाईकाच्या सुख- दुःखात जाणारा माणूस कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे थांबवत नाही. मिळेल त्या साधनाने प्रवास करत सकाळचा दशक्रिया विधी असो की लग्न समारंभ, त्याला तो हजेरी लावतो. मात्र, या कार्यक्रमांना आलेली नेते मंडळी अशाही उन्हाच्या तडाख्यात माईक सोडत नाहीत. वातानुकूलित गाडीत आलेल्या नेते मंडळीवर याचा परिणाम होत नसून सर्वसामान्य नागरिक मात्र त्यांच्या भाषणांवर वैतागत उन्हात होरपळून निघत आहे.
सध्या सुर्यनारायणाचे दर्शन सकाळी लवकरच होत असून तो देखील सकाळपासूनच लालबूंद अवस्थेत दिसू लागला आहे. दशक्रिया विधीत प्रवचनकाराचे प्रवचन तासभर चालते. त्यातून समाजाला प्रबोधन व्हावे, हा उदात्त दृष्टिकोन असतो. जवळच्या नातेवाईकाच्या किंवा मित्र परिवाराच्या दुःखात सामिल होऊन त्या कुटूंबाचे दुःख कमी करण्याचा हा प्रामाणिक विचार असतो. पण, त्यामुळे सकाळपासून डोक्यावर छत नसलेल्या ठिकाणी ताटकळत थांबावे लागते. काकस्पर्श होईपर्यंत नऊ वाजलेले असतात. या काळात सुर्यनारायण चांगलाच तापलेला असतो. त्यानंतर नेते मंडळी श्रद्धांजली पर भाषणे सुरू करतात. या भाषणात खरे तर त्या कुटूंबाची व्यथा किंवा समाजासाठी त्याने केलेले योगदान आणि कुटूंबाचा संदर्भ असतो. प्रत्येकाच्या तोंडून हेच वारंवार सांगितले जाते. यामध्ये तासभर तरी जातो. पण या काळात दोन-तीन तास उन्हात बसलेले श्रोते मात्र, अक्षरक्षः उन्हाने होरपळून निघतात. या काळात समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनात काय चालले असेल? याचा ठावठिकाणा नेते मंडळीना नसतो.
सध्या लग्नसराई मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. या मंगलमय क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी जवळचा मित्र परिवार व नातेवाईकांची उपस्थिती आवर्जून असते. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह असतील तर सर्वांचीच तारांबळ उडताना दिसते. मात्र, या उन्हाच्या तडाख्यातही तास न तास डिजेवर नाचणारी तरूणाई पहावयास मिळते. डिजेमुळे लोकांना त्रास होऊन मृत्यूच्या घटना घडत आहेत. डिजेवर बंदी असतानाही बहुतेक वराती व लग्न समारंभात डीजे सर्रास वाजवला जातो. पोलिस देखील याकडे नजर चुकवून आर्थिक हितसंबंध साधतात की काय? असाही प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो. तास न तास नाचणाऱ्या तरूणाईमुळे लग्न सोहळ्याला उशीर होतो. त्यातून बंदिस्त मंगल कार्यालयात वऱ्हाडी अक्षरक्षः उकडून निघतात. कार्यवाहक थंडपेय, मठ्ठा सारखे पेय देऊन स्वागत करत असला तरीही उन्हाच्या तडाख्यात या थंडपेयांचा काहीच फायदा होत नाही.
वर बापाची भेट घेऊन वधु-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकून पुढील लग्न कार्याला जावे, यासाठी सगळ्यांचीच धडपड असते. मात्र, लग्न सुरू होण्याच्या कालावधीत नेते मंडळीच्या शुभेच्छा सुरू होतात. त्यामुळे मंगल कार्यालयात ताटकळत बसणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या मनाची परिस्थिती वेगळी असते. या भाषणातही दोन्ही वर-वधू कडील कुटूंबाबाबत संभाषण केले जाते. प्रत्येक कार्यालयात या कुटूंबाबाबत माहिती देण्यासाठी निवेदक ठेवलेले असतात. पण तरीही ही नेते मंडळी या कुटूंबाबाबत बोलत असतात. त्यात वेगळेपण काहीच नसते. येथेही पुढच्या लग्नाला जायचंय, शुभेच्छा उरका, लग्न लावून घ्या अशा कानपिचक्या लग्न समारंभात सध्या येत आहेत.
वेळ हा आपल्यासाठी भारी विनोद आहे. आपल्याकडे कार्यक्रमाच्या ज्या वेळा सांगितल्या जातात, त्याचा आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होण्याचा काही संबंध नसतो. सातला कार्यक्रम सुरू करायचा असेल, तर पाचची वेळ निमंत्रण पत्रिकेवर असते. पाच लिहिलं म्हणजे सातपर्यंत लोक येतील, असा आयोजकांचा आडाखा असतो. तर, पाचची वेळ म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायला सात होणार, अशी खात्री लोकांना असते.
लोक लग्न वगैरे कथित शुभकार्याचे मुहूर्त इमाने इतबारे काढतात. पण, मुहूर्तावर कधीच कोणते कार्य होत नाही. मात्र, आता यात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा एक दिवस लग्न लागण्यापुर्वीच लोकं कार्यालयातून निघून जातील. या संदर्भात अशा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणाऱ्यांची वेगळीच अडचण असते. एखाद्याचे नाव घेतले नाही, तर त्याला राग येतो. त्यामुळे सूत्रसंचालक सरसकट उपस्थित सर्व पुढाऱ्यांची आशिर्वाद देण्यासाठी किंवा श्रद्धांजली वाहण्यासाठी नावे घेतो. त्यामुळे या कार्यक्रमांना उशीर होत आहे.
आता या कानपिचक्या नंतरही ग्रामस्थ बदलतील याची खात्री कुणालाच नाही. कारण फोन करुन राजकीय पदाधिकारी, नेत्यांना दशक्रिया विधीला बोलावण्याची नवीनच पद्धत गेल्या काही वर्षांत पूर्व हवेलीत सुरू झाली आहे. जो समाज दशक्रिया विधी सारख्या दुःखद घटनेचा “इव्हेंट” बनवतो, तो समाज अशा प्रकारच्या शंभर कानपिचक्यांनीही सुधारणार नाही, हेच खरं आहे.