पुणे: बुधवारी राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. १९-२० नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार राज्यातील तब्बल ८,९८७ बसगाड्या निवडणूक कामांसाठी कार्यरत होत्या. मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी या बसेस वापरण्यात आल्या. मात्र, याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून गेल्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश आगारांत बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काही आगार चक्क एसटी बसेस नसल्याने बंद ठेवण्याच्या धक्कादायक घटना देखील घडल्या. विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी आगार पूर्णतः बंद ठेवण्याच्या घटना सर्वाधिक घडल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्यातील विविध आगारांत, बस स्थानकांवर मतदानासाठी मूळ गावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह इतर सामान्य प्रवाशांचे बरेच हाल झाले.
विधानसभा निवडणूक मतदान २० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. निवडणुकीच्या दृष्टीने मागील आठवड्याभरापासून सर्व यंत्रणा कार्यरत होत्या. यासोबत निवडणूक आयोगाने मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडे ८,९८७ बसगाड्यांची मागणी केली त्यानुसार, एसटी महामंडळाकडून मागणीनुसार बसेस पुरवण्यात आल्या. मतदान झाल्यानंतर मतपेट्या ने-आण करण्यासाठी प्रतिवर्षी एसटीची मदत घेतली जाते. यंदाच्या निवडणुकीत देखील १९-२० नोव्हेंबरला एसटी बसेस धावल्या. यामुळे निवडणूक आयोगाला चांगली मदत झाली असली, तरी दुसऱ्या बाजूला राज्यातील सामान्य प्रवाशांची लालपरी ठिकठिकाणी उपलब्ध नसल्याने विविध आगारांत प्रवासी त्रासले गेले. दिवसा बसेसची संख्या काही अंशी असली, तरी रात्रीच्या वेळेस अनेक आगारांत, बस स्थानकांवर बसेस न आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदानासाठी शहरातून गावाकडे आणि मतदान केल्यानंतर गावाहून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांसह अन्य दैनंदिन प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला.
अजब सूचना फलक
निवडणूक कामांसाठी एसटी बसेस वापरणे नवीन नाही. मात्र, कधीच वाहतूक पूर्णतः बंद होत नाही; पण यावेळी विधानसभा निवडणुकांवेळी राज्यातील बहुतांश एसटी आगार चक्क बंद ठेवण्यात आले. एक्स अकाऊंटवर काही प्रवाशांनी याबाबतचे आगारात लिहलेले सूचना फलक फोटो काढून पोस्ट केले आहेत. कराड पोस्ट येथील एक फलक मिळाला असून यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, ‘प्रवाशांना सूचना, विधानसभा निवडणूक २०२४ मुळे कराड आगारातील सर्व बसेस निवडणुकीसाठी जाणार असल्यामुळे मंगळवार, १९ नोव्हेंबर आणि बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सर्व वाहतूक बंद राहील, याची प्रवाशानी नोंद घ्यावी व सहकार्य करावे. – आगार व्यवस्थापक, रा. प. कराड आगार.’ दरम्यान, राज्यातील बऱ्याच आगारांत असे फलक लावण्यात आले, तर काही ठिकाणी विना सूचना नागरिकांना खोळंबून राहावे लागले.