पुणे: दौंड गेल्या अनेक वर्षापासून उपनगर अर्थातच सब अर्बन सेक्शन नसलेला रेल्वे विभाग आहे. ज्यामध्ये अजुन या मार्गावर लोकल धावत नसल्याने विद्यार्थी, नोकरदार,व्यावसायिक यांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे – दौंड दरम्यान फक्त डेमु, मेमु शटलसेवा धावते, ज्यामुळे प्रवासामध्ये अनेक अडचणीला सामोरे जावे लागते.
लोकल सुरू होतील, अशी आशा बाळगणाऱ्यांची घोर निराशा झाली. पुढाऱ्यांच्या घोषणेला आता नागरिकही कंटाळले आहेत. उपनगर विभाग घोषित करूनच लोकल सुरू करा, मगच मते मागा असा सूर नागरीकांमधून उमटू लागला आहे.
रेल्वे अधिकारी यांनी उपनगर विभाग घोषित करुन ईएमयु लोकल लवकरच सुरू होतील, अशी घोषणा देखील केली होती. ती घोषणा फक्त चर्चेतच राहिली. त्यामुळे लोकल सुरू होतील, अशी आशा बाळगणाऱ्यांची आता घोर निराशा झाली.
पुणे-दौंड लोहमार्गावर मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण आहे. त्याच प्रमाणे शैक्षणिक संस्थादेखील आहेत. मोठ्या प्रमाणात दौंड ते पुणे प्रवाशांची गर्दी देखील असते. लोकल सेवा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दौंड व हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला जात असतात.
दौंडवरून पुण्याकडे सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी शटल गेल्यावर, त्यानंतर थेट पाच वाजता पुण्याला जायला शटल आहे. तसेच पुण्याहून दौंड येथे येण्यासाठी सकाळी ९.४० च्या शटल नंतर दुपारी तीन वाजता दुसरी शटल आहे. दुपारच्या वेळेत गाडी नसल्यामुळे महाविद्यालय, क्लासला जाणारे विद्यार्थी, नोकरी व्यवसाय करून परतणारे नोकरदार, व्यावसायिक यांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होतो. शटलने नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस, रिक्षा, आदी पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळही सोसावी लागत आहे. म्हणून लवकरात लवकर दौंडला उपनगर दर्जा देऊन ईएमयु लोकल सुरु कराव्यात. यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना देखील अनेक निवेदने दिली आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन अद्याप कुंभकर्णाच्या निद्रेत असल्यामुळे प्रशासनास जागे कोण करणार? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
आजी माजी आमदार – खासदार यांच्याकडे देखील उपनगर घोषित करुन लोकल सुरू कराव्यात, यासाठी अनेकांनी निवेदने दिली. मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाला जाग येईना. आता दौंड व हवेली तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी रेल्वे रोको आंदोलन करावे. आतापर्यंत आमदार, खासदार असो की रेल्वे मंत्री यांनी केवळ फक्त घोषणाच केल्या. रेल्वे प्रशासन जर रेल्वे सुरू करत नसेल तर सर्व लोकप्रतिनीधी रेल्वे रोको आंदोलन अभियान राबवून दौंड व हवेली तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा. या वर्षी जर उपनगर घोषित झाले व लोकल सेवा सुरु झाली तरच आगामी निवडणुकीत मत मागायला यावे, अशी मागणी दौंड व हवेली तालुक्यात जोर धरू लागली आहे.