उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात मागील पाच ते सहा दिवसांपासून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळ, दुपार आणि रात्री देखील तापमान कमी असले तरी प्रचंड उकाडा जाणवत असल्याने सर्वसामान्य नागरिक उकाड्याने बेचैन झाले आहेत.
दुपारी २ वाजेपर्यंत कडक ऊन, सायंकाळी आकाशात ढग येतात, आभाळ काळेकुट्ट होते. परंतु, पाऊस मात्र रोजच हुलकावणी देत असल्याने पूर्व हवेलीतील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय उकाड्याच्या बचावासाठी पंखे, कुलर, वातानुकुलित यंत्रणा असली तरीही पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वत्र वाढलेले सिमेंटचे जंगल आणि कमी झालेली झाडांची संख्या म्हणूनच सध्या तापमान प्रचंड वाढल्याचे चित्र दिसत आहे.
त्याचबरोबर परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरीकांना उकाडा, गरमी आणि डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातून काम करणारे नोकरदार, गृहिणींची घर कामे आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास या सगळ्या गोष्टींवर परिणाम होत आहे.
सकाळपासूनच उन्हाच्या झळा असह्य होत असून रात्री आठपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत. उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण आहेत. गेल्या आठवड्यातील अवकाळीनंतर तीन दिवसांपासून सूर्यनारायणाचा प्रकोप जाणवत आहे. अतिउष्णतेच्या लाटा व वाढत्या तापमानामुळे लहान मुले, वृद्ध, गर्भवती, अपघातग्रस्त रुग्ण त्रस्त आहेत. उकाड्याने हैराण झालेले नागरिक गच्ची, बंगल्याच्या टेरेसवर झोपण्याला पसंती देत असले तरी रात्रीदेखील उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच हवा नसल्याने झळांचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. सायंकाळपर्यंत शहरातील बाजारपेठा ओस पडत आहेत.
काळजी घेण्याचे आवाहन
पंखे व अन्य विजेची उपकरणेही गरम हवा फेकू लागले असून दुपारी घर, कार्यालय, आस्थापनांमध्ये बसणे अवघड झाले आहे. नागरिक उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करत आहेत. मान्सून सुरू होईपर्यंत तापमानाचा पारा कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.