इंदापूर: इंदापूर नागरी संघर्ष समितीच्या २४२ दिवसांच्या धरणे आंदोलनास पहिले यश मिळाले आहे. सहाशे चौरस फुटाच्या आतील बांधकामांना लागलेला दंड व शास्ती पूर्णतः माफ, तर ९० चौरस मीटरच्या आतील घरांना ५० टक्के माफ करण्याचा निर्णय इंदापूर नगरपरिषदेने घेतल्याची माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक प्रा. कृष्णा ताटे यांनी दिली.
ते म्हणाले की, वरील मागण्यांसह नगरपरिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या एकूण २७ मागण्यांसाठी गेल्या २४२ दिवसांपासून इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने नगरपरिषदेच्या प्रांगणात धरणे आंदोलन सुरू केले. २ डिसेंबरला संघर्ष समितीने धरणे आंदोलनाचे रूपांतर लाक्षणिक उपोषणात केले. इंदापूर नगरपरिषदेने सप्टेंबर २०१८च्या शासन निर्णयानुसार सहाशे चौरस फुटाच्या आतील बांधकामाला शंभर टक्के शास्ती माफ केल्याचे पत्र नगरपरिषदेने संघर्ष समितीला दिले. या पत्रामध्ये ११४ जणांची नावे देण्यात आली. यापुढे ही सर्वेक्षण चालू राहाणार आहे. त्या सर्वेक्षणात ६०० चौरस फूट व ९०० चौरस फुटाच्या आतील बांधकामांना शासकीय व दंड केल्याचे आढळल्यास त्यांना ही माफी दिली जाणार आहे.
इंदापूर नागरी संघर्ष समितीला मिळालेले हे सुरुवातीचे यश आहे. लोकहिताच्या सर्व २७ मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे समितीचे निमंत्रक प्रा. कृष्णा ताटे यांनी स्पष्ट केले.