पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या बैठकीला सतत उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांची अखेर आयुक्त कार्यालयाने यादी तयार केली आहे. आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली असून यापुढे बैठकीला उशीर झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
पालिकेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभा आणि विभाग बैठक आठवड्याच्या दर मंगळवारी घेण्यात येते. बैठक आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होते. मात्र, स्थायी व सर्वसाधारण सभेच्या बैठकीला महापालिकेतील अधिकारी हे सतत उशिरा येत आहेत. वारंवार सुचना देवून देखील अधिकाऱ्यांच्या वर्तनात बदल होत नाही. त्यामुळे मंगळवारी (दि.१७) झालेल्या बैठकीला उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्याची नावे आयुक्तांनी स्वीय सहायकांना घेण्यास सांगितले. त्या अधिकाऱ्यांची नावे वहीत घेत तशी नोंद करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांची नावे महापालिकेच्या विभाग प्रमुखांच्या ग्रुपवर टाकून त्यांना यापुढे उशिरा आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशार आयुक्त सिंह यांनी दिला.
दरम्यान, आयुक्त कार्यालयातून काढण्यात आलेल्या लेटलतिफ अधिकाऱ्यांच्या यादीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य वैद्यकीय उपायुक्त मनोज लोणकर, सिताराम बहुरे, सहायक आयुक्त मुकेश कोळप, श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, राजेंद्र जावळे, दिलीप धुमाळ, विजयसिंह भोसले, मनोहर जावरानी, सुनिल भगवानी, उपअभियंता किरण अंधूरे, राजकुमार सुर्यवंशी, स्वप्नील शिर्के, प्रकाश कटोरे, मोहन खोंद्रे, ओमप्रकाश बहिवाल, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांचा समावेश असल्याचे समजते.