पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागामध्ये महिला सुरक्षित नसल्याचे मागील अनेक घटनांवरून लक्षात येत आहे. अशातच आता कॉलेजची फी रोख स्वरूपात घ्यावी यासाठी ट्रस्टींनी फायनान्स मॅनेजर असलेल्या महिलेच्या घरामध्ये घुसून धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी युनिय बिबलीकल सेमीनारी सोसायटीचे मुख्य ट्रस्टी डॉ. सुभाष डोंगरदिवे (वय-६१ वर्षे) आणि डेव्हिड हटारिया (वय- ६३ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या बिबवेवाडी येथील युनियन बिबलीक सेमीनारी सोसायटीच्या कॉलेजचा सर्व व्यवहार पाहण्याचे काम पाहते. विद्यार्थ्यांकडून चेक किंवा ऑनलाईन स्वरुपात जमा होणाऱ्या फी मधून कॉलेजच्या सर्व व्यवस्थापनाची मंजुरी घेऊन ज्या त्या विभागाचा खर्च देत असतात.
कॉलेजचे मुख्य ट्रस्टी डॉ. सुभाष डोंगरदिवे हे जून २०२४ मध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये आले. विद्यार्थ्यांकडून जमा होणारी सर्व फी चेक किंवा ऑनलाईन स्वरुपात न घेता ती आता रोख स्वरुपात घ्या. अशी सुचना फिर्यादी यांना दिली. यापुढे जमा झालेली रोख रक्कम आम्हाला द्या असे सांगितले. आपल्याला विद्यार्थ्यांकडून रोख स्वरुपात फी घेता येणार नाही. ते शासनाच्या नियमावलीच्या विरुद्ध आहे, असे फिर्यादी यांनी सांगितले.
दरम्यान, फिर्यादी महिला या घरी असताना १० जून २०२४ रोजी सायंकाळी डॉ. डोंगरदिवे आणि डेव्हिड हटारिया हे बेधडक त्यांच्या घरात शिरले. त्यांनी महिलेला धमकावून तू आमच्यासाठी कॉलेजची फी रोख स्वरुपात घे व तु आमची टीम जॉइन्ट कर, तू आमच्या म्हणण्याप्रमाणे काम कर, तू आमच्या म्हणण्याप्रमाणे काम केले तर, तुझा पगार वाढवू शिवाय तुला प्रमोशन देऊ. तु आमचे म्हणणे ऐकले नाही, तर त्याचे काय परिणाम होतील ते भोगण्यासाठी तयार रहा. नाही तर आम्ही तुला कामावरुन काढून टाकू, अशी धमकी दिली. ते घरातून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मात्र, आपली नोकरी जाईल या भितीने घाबरुन त्यांनी हे कोणालाही सांगितले नाही. या दडपणामुळे त्या खूप आजारी पडल्या. पती व इतरांनी त्यांना धीर दिल्यामुळे त्यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.