बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. परंतु, पवार कुटुंब (Pawar Family) एकत्र आहे की नाही? या प्रश्नाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले होते. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी पवार कुटुंब एकत्र जमले आहे. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अनेकजण यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी देखील हजेरी लावली. पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय मात्र अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबियांबाबतच्या चर्चा या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडियावर कुटुंबाचे काही एकत्र फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान पक्षात जरी फूट पडली असली, तरीही पवार कुटुंब हे कायम एकत्रच असल्याचं पवार कुटुंबाकडून सांगण्यात येते. आता भाऊबीजेला तरी अजित पवार हे उपस्थित राहणार का याकडे सर्वांच्या लक्ष लागले आहे.