केडगाव : पाटस-बारामती महामार्गावर मोठा अपघात झाला. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. दुचाकीवरुन शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात गोरक्षनाथ भंडलकर (वय १६,रा. हिंगणीगाडा, ता. दौंड जि. पुणे) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकी चालक ही जखमी झाला आहे.
ऋषिकेश रमेश भंडलकर ( वय १६, रा. हिंगणीगाडा ता. दौंड जि पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोबडे यांच्या खडी क्रेशर समोर हा अपघात झाला. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गोरक्षनाथ आणि ऋषीकेश हे इयत्ता दहावीमध्ये शिकत होते. ते वासुंदे येथील श्री श्रीगुरुकृपा माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. ६) सकाळची शाळा असल्याने दुचाकीवरुन शाळेत जात होते.
शाळेत जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात या दोघांना गंभीर मार लागला. गोरक्षनाथ भंडलकर यास बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तर ऋषिकेश हा गंभीर जखमी झाल्याने त्यास पाटस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी पाटस–बारामती महामार्गावर रास्ता रोको केला होता. ग्रामस्थांच्या रास्ता रोकोची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली.