दौंड, (पुणे) : हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील एका व्यक्तीची जमिनीच्या व्यवहारात नऊ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत आणि पाटस पोलिसांनी पुण्यातून इंस्टाग्राम रील स्टारला अटक केली आहे. याबाबत किरण यादव यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विश्वनाथ देसाई आणि माया विश्वनाथ देसाई (दोघे रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्या विरुध्द यवत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून विश्वनाथ देसाई यांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी काचन येथील अनिल लक्ष्मण काचन याना जमिनीच्या व्यवहारासाठी १ कोटी रूपये रक्कमेची गरज असल्याने १ कोटी रूपये २ टक्के व्याजाने देतो, त्यापोटी तारण म्हणून शिंदवणे येथील दिड एकर क्षेत्र साठेखत करून द्यावे लागेल, असं सांगत विश्वास संपादन केला.
सदर साठेखतासाठी लागणारा ६ लाख रूपये खर्च आर. टी. जी. एस व रोख रकमेव्दारे स्विकारून काचन यांची संशयित आरोपी विश्वनाथ देसाई व माया विश्वनाथ देसाई यांनी फसवणुक केली. तसेच कांचन यांचे नातेवाईक दौंड तालुक्यातील यवत येथील किरण यादव यांची देखील ९ लाख रूपये रोख स्वरूपात घेवुन फसवणूक केली होती. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी विश्वनाथ देसाई व माया देसाई हे दोघेही गुन्हा दाखल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर सोन्याचे दागिने घालून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. एवढचं नाही तर रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालणाऱ्या गाडीच्या समोर उभा राहून त्या व्हिडिओमध्ये “पुण्यात दिसेल, तिथे अटक करा”, असे रील्स बनवून पोस्ट टाकत यवत पोलीसांनाच आव्हान दिले. मग मात्र, यवत पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी सलीम शेख यांनी थेट पुण्यात जावून या आरोपीला अटक केली आहे.