पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर शिरुर मतदारसंघामधून त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला कात्री लागल्याची चर्चा सुरू झाली. त्याचवेळी शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार उभा राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता आमदार रोहित पवार यांनीही याविषयी मत व्यक्त केले आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच.!
आमदार रोहित पवार आज आंबेगावमध्ये आले असता, प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणत आहेत. आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात पार्थ पवार ही असू शकतात. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील; त्यामध्ये शिरूर लोकसभा मिळणार नाही.”
दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावाटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा याबाबत समोर येईल.
या वेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध सुप्रिया आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या, त्यांनी केवळ समाजसेवा केली आहे. बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी होणार आहे. त्यामुळे आम्ही अजित दादांविरोधात बोलू, असे रोहित पवार म्हणाले. अजित दादा सध्या युगेंद्र पवार म्हणत असतील ‘शरद पवार साहेब तसं’, म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.