उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठेत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पार्किंगच्या कारणातून दुकानदार आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटनाही घडत आहेत.
उरुळी कांचन शहरातून जाणार्या पुणे-सोलापूर महामार्गाच्या पथकर मार्गावर तसेच उरुळी कांचन गावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी व आश्रम रोडच्या दोन्ही बाजूला पथार्या मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आश्रम रोड ते तळवाडी चौक या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
उरूळी कांचनमधील मुख्य अंतर्गत रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे या रस्त्याची रुंदी कमी झालेली आहे. त्यातच या मार्गावर अस्ताव्यस्त पद्धतीने उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. उरुळी कांचनमधील बहुतेक शाळा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, बँका, निसर्ग उपचार, आश्रम, पतपेढ्या, यांच्याकडे पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने वाहनांची रस्त्यावर पार्किंग केली जाते. या गोष्टीकडे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.
मुख्य बाजारपेठ असूनही याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पार्किंगची व्यवस्था नाही. इच्छा नसताना खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यालगत किंवा दुकानांसमोर वाहन पार्क करावी लागते. एका दुकानात खरेदीस आलेल्या नागरिकांनी इतर दुकानासमोर वाहने उभी केल्यास त्या दुकानदाराकडून वाहने काढण्याचा तगादा लावला जातो. त्यातून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये वाद होतात. असे वाद टाळण्यासाठी नागरिक खरेदी न करता पर्यायी बाजारपेठेचा मार्ग धरतात.
दरम्यान, मुख्य बाजारपेठेतील बहुतांशी व्यावसायिक अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार असून त्याचा परिणाम येथील व्यावसायिकांवर होणार आहे. कालांतराने उरुळी कांचनची बाजारपेठ संपुष्टात येण्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांसह नागरिकांकडून होत आहे.
मॉल, ऑनलाइन खरेदीकडे कल..
शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहन पार्किंगसाठी व्यवस्था नाही. दुकानांसमोर वाहने लावल्यास व्यावसायिकांकडून वाद घातला जातो. प्रत्येकवेळी जाणवणाऱ्या या समस्येमुळे खरेदीसाठी आलेले नागरिक बाजारातून काढता पाय घेत मॉलचा रस्ता धरतात. त्याठिकाणी पार्किंग व्यवस्था असल्याने मनसोक्त खरेदी केले जाते. तर काहीजण ऑनलाइन खरेदीचा पर्याय अवलंबतात. त्याचा परिणाम बाजारपेठेतील व्यावसायिक आणि बाजारपेठेवर होत आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायतची बाजारपेठ ही मोठी असून, या गावात जाण्यासाठी मुख्य दोनच रस्ते आहेत. याठिकाणी वाहनांना अडचण ठरणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. ग्रामपंचायत प्रशासनाशी सम विषम पर्किंग संबंधी चर्चा सुरु आहे.
– शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन, (ता. हवेली)उरुळी कांचनची व्यापारी बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर वाढली, परंतु वाढत्या बाजारपेठेस पोषक सुविधा न वाढल्यामुळे व्यापारी आणि ग्राहक वर्गास पार्किंग, ट्रॅफिकजाम, शौचालय ते व्यापाऱ्यांची सुरक्षितता इ. समस्यांचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या निमित्ताने प्रशासनाने पे अँड पार्क, वाहतूक स्वयंसेवक, फिरते शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध कराव्यात. हातविक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वतंत्र जागा उपलब्ध करावी, तसेच उरुळी कांचन मधील ट्रॅफिक जामची समस्या सोडविण्यासाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम्स (ITS) लागू करावी.
– विकास जगताप, उपाध्यक्ष, व्यापार आघाडी भाजपा, महाराष्ट्र प्रदेशव्यापारी, भाजीवाले, हातगाड्या असणाऱ्या तसेच पार्किंग होत असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून अतिक्रमणाबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच अनधिकृत पार्किंग होत असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. नागरिकांनी आपआपल्या गाड्या व्यवस्थित लावाव्या कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा पंचायतीतर्फे कारवाई करण्यात येईल
– अमित (बाबा) कांचन, सरपंच, उरुळी कांचन (ता. हवेली)