हडपसर : खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने वैदवाडी येथे फिर्यादीच्या घरावर हल्ला करून परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड करत दहशत पसरवली. सोमवारी (ता. १८) रात्री १०.३० च्या सुमारास हडपसर हद्दीतील वैदूवाडी येथे हा प्रकार घडला. हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने संबंधित घटनेची तत्काळ दखल घेत काही तासांतच आरोपींना जेरबंद केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी तानाजी मारुती खिलारे (वय ४९, मार्केंडेय नगर, वैदवाडी, हडपसर) हे त्यांच्या राहत्या घरासमोर थांबले असताना त्यांच्या परिसरात राहणाऱ्या मुलांनी हातामध्ये लोखंडी शस्त्रे घेवून फिर्यादीच्या भावाचा मुलगा विश्वास गणेश खिलारे याने अनिकेत पाटोळे, रवी पाटोळे, आदित्य पाटोळे व इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध शनिवारी (ता. १६) खडक पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादींना लोखंडी शस्त्राने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरासमोर पार्क मोटारसायकल व मोटार कारच्या काचा फोडल्या व इतर वस्तीतील ७-८ गाड्यांचे नुकसान केले. तसेच बेकरी व प्रोव्हिजन स्टोअर्सच्या काउंटरच्या काचांची तोडफोड करुन त्यांचेही नुकसान केले. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत ‘कोणालाही सोडू नका, आडवा येईल त्याला मारा, कोणी मध्ये आल्यास त्याला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली.
याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हडपसर पोलीस तपास पथकाने तत्काळ गुन्हेगारांचा शोध घेत आरोपी अनिकेत रविंद्र पाटोळे (वय २३), आदीत्य रविंद्र पाटोळे (वय २१), लखन बाळू मोहिते (वय १९), तुषार बाळू मोहिते (वय १८), हसनील अली सेनेगो (वय १९), गौरव विजय झाटे (वय १९), पंकज विठ्ठल कांबळे (वय २१), ऑकार महादेव देडे (वय २०, सर्व रा. बंदूवाडी, रामटेकडी, हडपसर) व ५ विधिसंघर्षीत बालके असे एकूण १३ जणांना अटक करून ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे हे करीत आहेत.