उरुळी कांचन, (पुणे) : पुण्यात असलेल्या नातीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या आजोबांची गाडी घसरून झालेल्या अपघातात आजोबांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम फाट्याजवळ मंगळवारी (ता. 21 मे) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली होती. शुक्रवारी (ता. 31) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
पांडुरंग बारकु उभे (वय -७३, रा. कोरेगाव मुळ दासवेवस्ती ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी सिमा अशोक तुपे (वय – 38, मजुरी रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमा तुपे या उरुळी कांचन येथील तुपे वस्ती परिसरात राहतात. मंगळवारी (21 मे) वडील पांडुरंग उभे हे त्यांच्याजवळ असलेली दुचाकी घेऊन पुण्यातील धायरी, रायकरमळा येथे राहत असलेल्या त्यांच्या नातीला भेटण्यासाठी सायंकाळी उरुळी कांचन येथून निघाले होते. उरुळी कांचनवरून पुण्याकडे जात असताना त्यांची गाडी कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम फाट्याजवळ घसरली.
दरम्यान, या अपघातात पांडुरंग उभे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना काही नागरिकांच्या मदतीने उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी (ता. 31) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत