Pachgani News : पाचगणी : सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज १३ दिवस संपले तरी अद्याप आरक्षणप्रश्नी तोडगा निघालेला नाही. यातच येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मराठा बांधव एकवटले आहेत. कराड तालुक्यातील गोटेवाडी ग्रामपंचायतीने, मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात येईल, असा ठराव संमत केला आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाणार असल्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
गोटेवाडी (ता. कराड) ग्रामपंचायतीच्या वतीने कराड तहसीलदारांना निवेदन दिले असून, सर्व राजकीय पुढारी व राजकीय पक्षांना गाव बंदी करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयाला विलंब होत असल्याने आता आंदोलनाची धार तीव्र होत आहे. मराठा आरक्षणासाठी सराटी येथे चालू असलेल्या उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला. याच्या निषेधार्थ हा ठराव घेण्यात आला आहे.
अत्यंत शांततेत हे आंदोलन चालू असताना शासनाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पुढाऱ्यांनी गावामध्ये मते मागण्यासाठी, राजकीय सभेसाठी, उद्घाटनासाठी गावात येऊ नये, अशा पद्धतीचा ठराव गोटेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाकडून एकमताने घेण्यात आला. १० सप्टेंबर रोजी हा ठराव करण्यात आला. जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
या ठरावावर ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत. या वेळी सरपंच डॉ. विलास आमले, सदस्य अनिल जाधव, जयवंत डुबल, अजित मोहिते, दशरथ जाधव, निळकंठ शेडगे आदींची उपस्थिती होती.