चाकण : चाकण- आळंदी रस्त्याला असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रस्ताव देऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री शिंदे व वनमंत्री मुनगुंटीवार यांनी याबाबत संबंधित विभागाला तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही दिले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याकडे याबाबत मागणी करुन वन विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त बैठक घेऊन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन्हीही विभागाकडून एकत्रित करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे, असे गोरे यांनी सांगितले. दोन्ही विभागांमध्ये सकारात्मक बैठका होऊन याबाबतच्या प्रकल्प अहवालास महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली असून, ज्ञानराई वनउद्यान या नावाने सदर प्रकल्प होणार आहे.