लोणी काळभोर : मराठा साम्राज्याचे संस्थापक, शासक आणि अद्भुत योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या 367 व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. १४) विविध धार्मिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे प्रतिष्ठानचे यंदाचे आठवे वर्ष आहे. यावर्षी जयंतीनिमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील झेंडेवाडी येथील सरसेनापती हंबेरराव मोहिते गोशाळेला रविवारी (ता. १२) मोफत चारा वाटप करण्यात आला. तसेच वडकी येथील गंगातारा वृद्धासमास अन्नदान करण्यात आले आहे.
दरम्यान, शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने उद्या मंगळवारी लोणी काळभोर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी सिद्धिविनायकचा लाईट्स व लेजरचा शो असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर येथे 14 मे 1657 साली झाला. त्यांचे मूळ नाव शंभू राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली, पण तितक्याच कौशल्याने आणि शौर्याने मुघल साम्राज्याचा पायाही हादरवला. 14 मे रोजी या महान राजाचा जन्मदिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.