लोणी काळभोर : गुढीपाडव्याचे औचित्य साधून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टच्या वतीने मंगळवारी (ता.९) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी धनगर समाजाने सादर केलेले गजनृत्य सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
रामदरा येथील सर्व मंदिरातील देवतांचे मुकुट सोन्याचांदीच्या दागिण्यांसमवेत रामदरा शिवालयाचे शिल्पकार स्वर्गीय १००८ श्री देवीपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा व त्यांचे शिष्य मंगलपूरी महाराज यांच्या पादुकांची सजवलेल्या बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धुंदीबाबा यांचे उत्तराधिकारी हेमंतपूरी महाराज उपस्थित होते. संत सावतामाळी मंदिराजवळ महात्मा फुले तरुण मंडळाच्या सदस्यांनी शोभायात्रेत सहभागी झालेले भाविकभक्त व ग्रामस्थांना सरबताचे वाटप केले.
यावेळी तरवडी, रानमळा, कोळपे वस्ती व केसकरवस्ती येथील धनगर समाज बांधवांनी सादर केलेले गजनृत्य व वादन सर्व ग्रामस्थांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची मुक्त उधळण व ढोलाच्या तालावर आबालवृध्दांचा पडत असलेला पदन्यास पाहण्यासाठी लोणी काळभोर गावांत नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, चौकाचौकांत या शोभायात्रेचे भाविकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रामनवमी निमित्त भंडाऱ्याच्या व इतर साहित्याची खरेदी आज करण्यात आली. तसेच आजपासून रामनवमीपर्यंत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
तसेच यावर्षी तिर्थक्षेत्र रामदरा येथे रामनवमी निमित्ताने मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज आहे. भाविक व पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सर्व नियोजन केल्याची माहिती १००८ श्री हेमंतपूरी महाराज यांनी दिली.