-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : देशाच्या अमृतमहोत्सवातंर्गत शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला पळसदेव (इंदापूर) येथे सुरुवात झाली आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन राष्ट्राभिमान जागृती आणि देशाच्या गौरवासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरांवर दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज फडकविण्याबाबत शासकीय परिपत्रकाद्वारे सुचित केले आहे. त्याच अनुषंगाने पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाने हर घर तिरंगा उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने तिरंगा रॅली काढत प्रभातफेरीचे आयोजन केले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान आदि घोषणा देत गावातून प्रभातफेरी काढत घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याबाबत जनजागृती केली.
विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव यांनी तिरंगा रॅलीचे नियोजन केले. या वेळी हिराजी काळे, मुरलीधर गिते, संदिप काळे, नितीन दशवंत, रामचंद्र वाघमोडे, वृषाली काळे, सुवर्णा नायकवडी, पांडुरंग कुचेकर आदिंसह शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते.