राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी कार्यालयात पुढील तीन महिने दर बुधवारी कुणबी दाखले देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश तहसीलदार अरुण शेलार यांनी दिले आहेत. जय शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे व मराठा समाजाच्या वतीने दौंड तहसील कार्यालय येथे उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाला प्रतिसाद देत तहसीलदार अरुण शेलार यांनी आदेश दिले आहेत.
दौंड तालुक्यातील १६ मंडल अधिकारी कार्यालयात दर बुधवारी कुणबी दाखले देण्यासाठी मंडल अधिकारी व तलाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्व नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व सेतु कार्यालय व महा-ई-सेवा केंद्र यांच्या साहाय्याने पुढील तीन महिने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात प्राप्त झालेले दाखले, निर्गत झालेले दाखले याचा गावनिहाय अहवाल मंडल अधिकारी यांनी त्याच दिवशी तहसील कार्यालयाकडे जमा करावा, या विशेष शिबिर कामकाजात कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये, अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) अधिनियम अन्वये शिस्तभंग कारवाई करण्यात येईल अशा सूचना देखील दिल्या आहेत.