उरुळी कांचन, (पुणे) : खामगाव (ता. दौंड) येथील खांबेश्वर शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या संस्थेला बंदिस्त सभागृह वेळेत पूर्ण न केल्याने मंजुर अनुदान व्याजासह परत करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिले आहेत. या घटनेने शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव येथील खांबेश्वर शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांना क्रीडा सुविधांसाठी आर्थिक सहाय्य योजना सन 2015-16 अन्वये बंदिस्त सभागृह बांधकाम करण्यासाठी 90 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. सदर अनुदान प्राप्त झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत बांधकाम पूर्ण करायची आवश्यकता होती.
मात्र, पाच वर्षानंतरही बांधकाम पूर्ण न झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते राहुलकुमार अवचट यांनी याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याबाबत कोणताही पत्रव्यवहार न झाल्याने एप्रिल 2024 मध्ये माहिती अधिकार अंतर्गत माहिती विचारली असता जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या वतीने जुन 2024 खांबेश्वर शिक्षण संस्थेला बंदिस्त प्रेक्षागृह बांधकामाचे प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला, विनियोग प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शासन निर्णयाप्रमाणे अनुदान वितरित केल्यानंतर सदर अनुदानाचा विनीयोग एक वर्षाच्या आत प्रकल्प पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला, प्रकल्पाच्या विविध टप्प्यावरील फोटोसह विनियोग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रकल्पास भेट दिली. यावेळी प्रकल्पाचे शंभर टक्के काम पूर्ण न झाल्याचे आढळले. अनुदान मंजुरीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याने अनुदान वितरित झालेल्या दिनांकापासून प्रचलित दराने व्याजासह रक्कम जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्याकडे जमा करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे दिले आहेत.
दरम्यान, 6 जून 2024 रोजी पुणे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने खांबेश्वर शिक्षण संस्थेला लेखी पत्र देऊन कळवले होते की, क्रीडा सुविधांसाठी आर्थिक सहाय्य योजना सन 2015-16 अन्वये 90 लाख रुपये मंजूर झालेले असून ते आपल्या संस्थेस वितरीत करण्यात आलेले आहे. तसेच संस्थेला 17 मे 2022 तसेच 30 ऑगस्ट 2023 आणि 16 मे 2024 च्या पत्रानुसार कागदपत्राची पूर्तता 7 दिवसाच्या आत करण्यास सांगितले होते. आज पर्यंत कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता या कार्यालयाकडे केलेली नाही. संस्थेने 29 मे 2024 च्या पत्रानुसार वारंवार 95 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे व 2 महिन्यात काम पूर्ण करू असे सांगितले होते.
शासन निर्णयानुसार अनुदान वितरीत केल्यानंतर सदर अनुदानाचा विनियोग एक वर्षाच्या आत प्रकल्प पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला, प्रकल्पाच्या विविध टप्यावरील फोटोसह विनियोग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते, तथापि प्रस्तुत प्रकरणी अनुदान मंजुरीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याचे सदर ठिकाणी दिसून आले. सबब मंजूर अनुदान वितरीत झाल्याच्या दिनांकापासून प्रचलित दराने व्याजासह वसूल का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा 20 जून 2024 पूर्वी करावा अन्यथा अनुदान वसुलीची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा कार्यालयाकडून संस्थेला देण्यात आला होता.
दरम्यान, इशारा दिल्यानंतरही अद्याप प्रकल्पाचे 100 टक्के काम पूर्ण झालेले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी अनुदान मंजुरीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सबब मंजूर अनुदान वितरीत झाल्याच्या दिनांकापासून प्रचलित दराने अनुदान व्याजासह परत करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगवडे यांनी आदेश दिले आहेत.
याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष माणिकराव नागवडे म्हणाले, ” 2016 मध्ये 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार सदरील काम सुरु करण्यात आले होते. काम करताना पुढील दोन वर्ष दुष्काळ पडला त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे बांधकाम बंद ठेवण्यात आले. त्याच्या पुढील काळात कोरोना आला. त्यातच पुन्हा कामगार व स्टील, खडी, वाळू, सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाल्याने हे बांधकामाला जास्त पैसे गेले. आजपर्यत 2 कोटी पर्यंत खर्च झाला आहे.
संस्थेकडून राज्याच्या क्रीडामंत्र्यांना पत्र..
खामगाव (ता. दौंड) येथील खंबेश्वर शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या संस्थेला बंदिस्त सभागृह वेळेत पूर्ण न केल्याने मंजुर अनुदान व्याजासह परत करण्याचे आदेश जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी निवेदनाद्वारे दिले होते. निवेदन संस्थेला प्राप्त झाल्यानंतर संस्थेकडून राज्याचे क्रीडामंत्री सुनील बनसोडे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या पत्रानुसार, तालुकास्तरही नसलेल्या छोट्या गावात संस्थेत 1 हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व अन्य व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेत 2015-16 या आर्थिक वर्षात अनुदान मंजूर झाले होते. कामकाजाला सुरुवात करण्यास 2017 साल उजाडले. दुष्काळ परिस्थिती, युद्धजन्य परिस्थितीमुळे भरमसाठ वाढलेल्या लोखंडाच्या किमती, करोना, त्यामुळे कामगारांची उपलब्धता नसणे इत्यादी कारणांमुळे क्रीडा संकुलाचे कामकाज लांबले होते. त्याबाबत वेळोवेळी जिल्हा क्रीडा अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा, त्यांची प्रत्यक्ष भेट व त्याबाबतचे अहवाल सादर केले आहेत.
सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून संस्थेचे सुसज्ज बंदिस्त क्रीडा संकुल उभे राहिले आहे. नुकताच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून काम अपूर्ण असल्यामुळे अनुदान परत करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजवणाऱ्या व त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांकडून, कष्टकऱ्यांकडून पैसे गोळा करून संस्थेने काम पूर्णत्वास नेले आहे. तरी कृपया क्रीडा अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करून आमच्या संस्थेत सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे.