राजेंद्र (बाप्पू) काळभोर
दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणे, हाच या सणाचा उद्देश आहे. यासाठीच ज्यांच्या घरात हा दीपोत्सव साजरा होत नाही अशांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी सामाजिक भावनेतून पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या लाडू चिवड्यातील ठराविक भाग अशा नागरिकांना देण्याची गरज आहे. आपलेपणा, ओलावा, माणूसकी, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे झाले तरच ही दिवाळी खऱ्या अर्थाने ‘गोड’ होईल.
भारतीय संस्कृतीत सणवारांना महत्त्वाचे स्थान आहे. देशातील प्रत्येक राज्यांत स्थानिक रुढी, परंपरांनुसार सण साजरे होतात. मात्र, बदलत्या काळाबरोबर सणांना आलेला दिखाऊपणा व चंगळवादी भपक्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होत आहे. दिवाळी देखील याला अपवाद नाही. या सणाला फक्त अवास्तव खर्च केला म्हणजे दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली, अशीच मानसिकता आहे. त्यामुळे सणांच्या निमित्ताने जपले जाणारे नातेसंबंध, भावबंध दूर होत आहेत. परिस्थितीच्या रेट्यामुळे प्रत्येकजण आपापला आर्थिक स्तर उंचावण्याकडे लक्ष देत आहे. विशेष म्हणजे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या तुसडेपणाची बाधा गावातील घरांनाही झाल्याचे पहायला मिळत आहे.
आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आहे. मी व माझे कुटुंब एवढेच बघण्याची आपल्याला सवय लागली आहे. अशा काही कारणांमुळे सणांसाठी येणारे पाहुणे दिसणे आता दुर्मिळ झाले आहे. वाढती महागाई व आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आपल्या चाकोरीबद्ध जीवनशैलीमुळे प्रत्येकावरच मर्यादा आल्या. कमी श्रमात आलेला जास्त पैसा, या पैशामुळे बोकाळलेली भोग संस्कृती, फ्लॅट संस्कृती यामुळे माणुसकीच्या नात्यातील अंतर कमी होत आहे. हे समाजातील कटू वास्तव नाकारता येत नाही. सण-उत्सवांमध्ये लोकांचा कमी होत चाललेला उत्स्फूर्त सहभाग व राजकीय लोकांचा हेतूपुरस्सर वाढत चाललेला हस्तक्षेप हा देखील संशोधनाचा विषय बनला आहे.
काही वर्षांपूर्वी दिवाळी सणाच्या काळात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाच्या लोकांना दिवाळी फराळासाठी आवर्जून बोलावले जात असे. आता स्वतःच्या छोटेखानी कुटुंबियांबरोबरच सणांचा आनंद घेण्यात गुंग होऊन त्यातच समाधान मानावे लागत आहे. मैत्रीची, पाहुण्या-रावळ्यांची ही नाती घट्ट होण्यासाठी हेच सण आपल्याला मदत करतात, हेच आपण सर्वजण विसरलो आहोत. यासाठी माणुसकी, स्नेहभाव, आपुलकी, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होण्याबरोबरच सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे.
शेजारधर्म मागे पडून त्याची जागा तुटकेपणाने घेतल्याने संवाद हरपल्याची तक्रार जो तो करीत आहे. हा संवाद वाढविण्यासाठी एकही जण प्रयत्न करत नाही. एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी, स्नेहबंध व माणुसकी कमी होण्यास आपणच कारणीभूत आहोत, हेच कोणी मान्य करत नाही. त्यामुळे हा मोठा मानसिक, सामाजिक गुंता होऊन बसला आहे. घरगुती दिवाळी साजरी करताना, दिवाळीसारख्या सणांचा आनंद आपल्याला मर्यादित स्वरूपात मिळत आहे, हेच कुणाच्या खिजगणतीत नाही.
सध्या पैशाच्या मागे लागण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की एकाच घरात राहणाऱ्या प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. पैसा कमी असला तरी चालेल; परंतु जवळची, हक्काची, प्रेमाची माणसे आपल्याजवळ मोठ्या संख्येने असावीत, अशी शिकवण मागील पिढ्यांनी आपल्याला दिली होती. हीच शिकवण आपण विसरलो आहोत. आगामी काळात तर अशी शिकवण आपल्या पूर्वजांनी दिली होती, हे पुस्तकातच वाचावे लागेल असा समज सध्या निर्माण झाला आहे. दिवाळी येते आणि जाते पण घरातील प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला. अशी दिवाळी सगळ्यांची म्हणायची की एकट्याची?
वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या सभोवताली गरिबीचे प्रमाण दखलपात्र आहे. या दीपोत्सवात त्यातील काहींच्या घरी दिवाळी साजरी होत नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी सामाजिक भावनेतून याकामी पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या लाडू चिवड्यातील ठराविक भाग अशा नागरिकांना देण्याची गरज आहे. आपलेपणा, ओलावा, माणूसकी, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. असे झाले तरच ही दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होईल.
लेखक – राजेंद्र (बाप्पू) काळभोर, जिल्हाध्यक्ष प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघ पुणे