शिरूर : वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील पुनर्वसन गावठाणातील संदीप शांताराम सावंत (वय ३२) याला चेक बाउन्स प्रकरणी शिरूर न्यायालयाने एक वर्षाची साधी कैद व २ लाख ५७ हजार ८५० रुपये इतका दंड ठोठावला आहे. शिरूरचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दत्तात्रय बी.डोमाळे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे.

या प्रकरणात तक्रारदार राहुल नारायण दिघे (वय २८,रा.गणेगाव रोड,कोंढापुरी,ता.शिरूर,जि.पुणे) यांनी शिरूर न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांनी दाव्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे, संदीप सावंत यांनी व्यवसायाच्या कारणासाठी राहूल दिघे यांच्याकडून दीड लाख रुपये रोख रक्कम घेतली होती. ही रक्कम पाच महिन्यांत परतफेड करण्याचे ठरले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत रक्कम परत न करता. सावंत यांनी दिघे यांना चेक दिला.

तो चेक राहूल दिघे यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यावर भरला असता, तो चेक बाउन्स झाला. यानंतर भारतीय दंड संहिता कलम १३८ नुसार आणि शिरूरच्या प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. न्यायालयात पुरावे, साक्षी आणि उलटतपासणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने अखेर संदीप सावंत यांना आरोपी जाहीर करून सावंत यांच्या विरुद्ध निकाल दिला.

न्यायालयाच्या आदेशानंतर संदीप सावंत याच्याविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित मांजरे यांनी संदीप सावंत याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयीन कारवाईनंतर आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
या खटल्यात तक्रारदाराच्या वतीने वकील जी.ई.दरेकर यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या बाजूने वकील यु.जे.सरोदे यांनी प्रतिवाद केला.







