पुणे (Pune News): फ्लॅटच्या गॅलरीला लावलेल्या लोखंडी जाळीत एक वर्षाचा चिमुकला अडकल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात घडली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी समयसूचकता दाखवत मुलाची सुखरुप सुटका करून त्याला जीवनदान दिले आहे. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणे खुर्द परिसरात असलेल्या राजश्री सोसायटीमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक लहान बाळ अडकल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच तातडीने सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचताच जवानांना समजले की, दुसऱ्या मजल्यावर एका सदनिकेच्या गॅलरीमध्ये असणाऱ्या लोखंडी जाळीमध्ये एक वर्षाचे बाळ अडकले असून दरवाजा देखील बंद झाला आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच धाव घेतली असता बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा मुलाचे डोके गॅलरीला लावलेल्या जाळीत अडकल्याचे दिसून आले.
त्यानंतर जवानांनी तातडीने जाळीत अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. जवानांनी अग्निशमन उपकरणांचा वापर केला. मात्र, अडकलेल्या मुलाला वेदना होत असल्याने ते रडत होते. तेव्हा जवानांनी जाळीजवळ त्या मुलाच्या आईला बसविले. जवानांनी कुशलतेने कॉम्बी टुल किटमधील हायड्राॅलिक स्प्रेडर आणि जॅक या उपकरणांचा वापर करुन जाळीत अडकलेल्या मुलाची अवघ्या मिनिटांत सुखरुप सुटका केली.
दरम्यान, मुलाची सुखरूप सुटका झाल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी अग्निशमन दलाचे जवान अशोक कडू, तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार यांचे आभार मानले. ही कामगिरी करणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक
लहान मुले ही खूप चंचल असतात. त्यांच्या शरीरामध्ये खूप बदल होत असतात. त्यामुळे ते सतत कोणतीही क्रिया करीत असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची समज नसते. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना इजा होऊ शकते किंवा कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.