शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावर रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात दोघांचा मृत्यू होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना घडलेली होती. यामधील एका जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून १२ एप्रिल रोजी एकाचा मृत्यू झाला. सुरज गणेश जगदाळे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून १० एप्रिल रोजी (एम एच १२ डब्ल्यू जे १७९५) ही रुग्णवाहिका रमेश राठोड या रुग्णाला घेऊन भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली होती. सदर रुग्णवाहिका समोरील (एम एच १२ १४ एम ५२८५) या दुचाकीला धडकल्याने भीषण अपघात आला. या अपघातात रुग्णाचा नातेवाईक सुमित बळीराम चव्हाण (वय २८ रा. रांजणगाव गणपती) हा जागीच ठार, तर गोविंद श्रीरंग पोळ, सुरज गणेश जगदाळे, ऋषिकेश गणेश जाधव (तिघे रा. सणसवाडी ता. शिरुर), तसेच रुग्णवाहिकेतील रमेश काशिनाथ राठोड, विकी रमेश राठोड व उषा रमेश राठोड (सर्व रा. रांजणगाव गणपती) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ११ एप्रिल रोजी गोविंद श्रीरंग पोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यांनतर अन्य जखमींची मृत्यूशी झुंज सुरु असताना १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास सुरज गणेश जगदाळे याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने मृतांची संख्या तीन वर गेली आहे. रुग्णवाहिकेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची शिक्रापूर परिसरातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.