उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका ३३ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती येथील चिंतामणी हॉस्पिटलच्या समोर रविवारी (ता.७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
साकुलाल पचुवा केवट (वय ३३, व्यवसाय-मजुरी, मूळ रा. ललीतपुर, उत्तर प्रदेश, सध्या रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ, ता. हवेली जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या परप्रांतीय व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज सिताराम शिंदे (वय ४४, व्यवसाय नर्सरी, रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मुळ, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज शिंदे यांची नर्सरी असून, त्यांच्याकडे साकुलाल केवट हा कामगार काम करत होता. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील चिंतामणी हॉस्पिटल समोर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.
दरम्यान, या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनोज शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार भुजबळ करत आहेत.