संतोष पवार
पळसदेव (पुणे ) : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 13 जून रोजी मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या नियोजनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय अभ्यासक्रम नियोजन पुस्तिका, मुख्याध्यापक मार्गदर्शिका, वार्तापत्र शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडर देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, शिक्षण सहसंचालक हरुन अत्तार, शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, एसएससी बोर्डाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षण वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक दत्तात्रेय कठाळे, संजय गंभीरे, लेखाधिकारी बी. व्ही. घुमरे आदि उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड यांनी केले आहे.