उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथे स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ हा उपक्रम रविवारी (ता.१) राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रमेश चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी निवेदनाद्वारे दिली.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सकाळी १० ते ११ या दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वार्डामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व ग्रामस्थ, शाळा, हायस्कूल व कॉलेजचे विद्यार्थी शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, बचत गट, तरूण मंडळ, महिला मंडळ, ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, उरुळी कांचन व धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत श्रमदान कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी व स्वच्छता विभाग सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इ. अधिकारी वर्ग उपस्थित राहणार असल्याचेही सरपंच कांचन व ग्रामविकास अधिकारी डोळस यांनी सांगितले.
कुठूनही होता येणार अभियानात सहभागी..
‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत.